“सुभेदार” या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याच्या तारखेमध्ये बदल ….
बऱ्याच दिवसापासून बहुचर्चित असलेला आणि प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्सुकता असलेला सुभेदार हा मराठी चित्रपट १८ ऑगस्ट २०२३ या दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु आता या तारखे मध्ये बदल करण्यात आलेला आहे.
‘सुभेदार’ हा श्री शिवराज अष्टका मधील पाचवा चित्रपट असून या चित्रपटांमध्ये तानाजी मालसुरे यांची शौर्यगाथा बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांमध्ये सुभेदार या चित्रपटाची उत्सुकता अगदी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाल्यापासूनच दिसत आहे. तसेच आजच्या पिढीपर्यंत आपल्या इतिहासाबद्दल अधिक माहिती पोहोचवण्यासाठी चित्रपट हे सुद्धा महत्त्वाचे माध्यम आहे असे म्हणता येईल.
‘सुभेदार’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये चिन्मय मांडलेकर असून मृणाल कुलकर्णी या राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या भूमिकेमध्ये आहे तर सुभेदार तानाजी मालसुरे यांची भूमिका अजय पुरकर यांनी साकारली आहे. तसेच सुभेदार या चित्रपटांमध्ये समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, स्मिता शेवाळे यांच्यासह इतरही कलाकार आहेत.
काही दिवसांपूर्वीच दिग्पाल लांजेकरांच्या सुभेदार या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला असून सुभेदार या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ”आमच्या लाडक्या कोंढाण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तिखटाप्रमाणे झोंबत आहेत ” या जिजाऊंच्या भूमिकेमध्ये असलेल्या मृणाल कुलकर्णी यांच्या डायलॉगने होते. या चित्रपटाचा ट्रेलर बघत असताना सुद्धा अक्षरशः अंगावर शहारे येतात जणू काही खरोखरच हे आपल्यासमोर घडत आहे, एवढ्या उत्तम पद्धतीने हा चित्रपट बनवला गेला आहे असे म्हणता येईल. तसेच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले ‘आले मराठे, आले मराठे’ हे गाणं सुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडलेले आहे.
‘सुभेदार’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सुरुवातीला २५ ऑगस्ट ठरवण्यात आलेली होती परंतु नंतर या तारखे मध्ये बदल करून ही तारीख पुन्हा १८ ऑगस्ट करण्यात आली.परंतु पुन्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता तांत्रिक अडचणीमुळे २५ ऑगस्ट केली आहे. या संबंधित चिन्मय मांडलेकर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ही माहिती दिली.
चिन्मय मांडलेकर यांनी असे लिहिलं आहे की, “जय जिजाऊ! जय शिवराय! नमस्कार.. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तान्हाजीराव मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर आपणां सर्वांना अनुभवता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आम्ही सगळे सुद्धा तुमच्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही चित्रपट तुमच्या भेटीला आणणारच आहोत. यासाठी लागणारा काळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करून श्री शिवराज अष्टकातले पाचवे पुष्प ‘सुभेदार’ दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित करीत आहोत. या अडचणीच्या काळात तुम्ही सर्व रसिक मायबाप आणि शिवभक्त आमच्या पाठीशी आधार बनून उभे रहाल ही खात्री आहे. हर हर महादेव..”